पुणे : राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार या बारामतीतील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत. तसेच लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. प्रत्येक जातीधर्माच्या, मंडळाच्या लोकांना त्या भेटत आहेत. कधीकधी मीडियाशीही संवाद साधत आहेत. एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील भावना व्यक्त करत आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत सुनेत्रा पवार यांची एक फेसबुक पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टमधून त्यांनी थेट शरद पवार गटाला सवाल केला आहे.
श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असं सुनेत्रा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुनेत्रा पवार आज भोर, वेल्हा, मुळशी दौऱ्यावर होत्या. त्यावेळी सारोळा येथील नागरिकांच्याही त्यांनी गाठी भेठी घेतल्या. त्यावेळी त्यांना त्यांच्या आजोळची आठवण आली, अशा भावना त्यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
काय आहे नेमकं पोस्टमध्ये ?
सारोळ्यात सगळेच एकवटले..! अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर, वेल्हे, मुळशी विधानसभा मतदारसंघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले. सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले.
महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या.
यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची दखल मी घेतली असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. ज्या ठिकाणी ही सदिच्छा भेट झाली ते ठिकाण पाहून मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना तालकाप्रमुख अमोल पांगारे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, बाळासाहेब गरुड, विद्याताई पांगारे, नीलम झांजले, अर्जुनराव अहिरे, गणेश निगडे, महेंद्र भोरडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे मनापासून आभार. अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे.