पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीला शिवीगाळ करून चाकूने पोटात वार करून पतीने तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. वाल्हेकरवाडी येथील राशिवले चाळीत सोमवारी २५ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नारोदेवी सुमेश राम (वय ३२), असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
यापाराकरणी सुमेश बुलुचराम (३५, रा. राशिवले चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बिंदूदेवी नरेश राम (३५, रा. राशिवले चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सुमेश आणि नारोदेवी हे पती-पत्नी आहेत. त्यांना तीन मुले आहेत. हे दाम्पत्य मुळचे बिहार येथील आहेत. रोजगारासाठी ते पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. दोघेही मजुरी करून आपली उपजीविका भागवतात. सुमेश आणि नाराेदेवी यांच्यात घरगुती भांडण झाले.
या कारणावरून सुमेश याने पत्नी नारोदेवी हिला शिवीगाळ करत मी तुला मारून टाकणार असं म्हणत घरातील भाजी कापण्याच्या चाकूने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला चढवला. या घटनेत तिच्या पोटात चाकूने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. नारोदेवी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे अधिक तपास करत आहेत.