लोणी काळभोर : मागील ९ वर्षांपासून बंद पडलेले लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या शासकीय शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय (डी.एड. कॉलेज) परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. भुरट्या चोरांनी इमारतीच्या दरवाजांचे कडी-कोयंडे देखील उचकटून चोरी केले आहेत. परिणामी कित्येक वर्षांपासून धूळ खात बंद पडलेले हे ज्ञानमंदिर भुरट्या चोरांचा व मद्यपींचा अड्डा बनला आहे.
लोणी काळभोर येथील शासकीय शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालयाची स्थापना १९४८ साली करण्यात आली होती. हे विद्यालय साडेसात एकरात पसरले असून या ठिकाणी वसतीगृहे व शिक्षकांना राहण्यासाठी सुसज्ज इमारती बांधण्यात आल्या आहेत. येथून तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानासारखे पवित्र काम केले जात होते. या ज्ञानमंदिरातून अनेक आदर्श व सुसंस्कृत पिढ्या घडल्या आहे. मात्र, मागील ९ वर्षांपूर्वी हे महाविद्यालय बंद पडले आहे.
दरम्यान, महाविद्यालय सन २०१५ साली बंद पडल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडून कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. इमारतीच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली नाही. शिवाय हे महाविद्यालय पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑईल व एचपी कंपनीच्या मध्यातून गेलेल्या रस्त्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर आहे.
विद्यालय आडबाजूला असल्याने महाविद्यालय व परिसरात भुरट्या चोरांनी व मद्यपींनी बस्तान बसवले आहे. वर्गखोल्या, कार्यालये, ग्रंथालय, स्वच्छतागृहे व मैदानात बिअर व दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून येत आहे. तरुण अंधाराचा गैरफायदा घेत गांजा, सिगारेट, मद्यप्राशन करत आहेत. चोरट्यांनी महाविद्यालयातील खोल्यांचे दरवाजे, चौकटी, कडी-कोयंडे, खोलींवरील पत्रे, हातपंपाचे दांडके देखील चोरून नेले आहेत. भिंतीवरील महापुरुषांच्या प्रतिमा धुळकट झाल्या आहेत. यामुळे सध्या या पवित्र शिक्षणमंदिराच्या इमारतीची भयावह अवस्था झाली आहे.
एकेकाळी या विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड उडत असे. याच वास्तूमध्ये दर्जेदार शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या हुद्यावर गौरवास्पद कामगिरी करत आहेत. काही आदर्श शिक्षण म्हणून कार्यरत आहेत. तर काही माजी विद्यार्थी प्रामाणिकपणे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले असून, प्रतिष्ठेचे जीवन जगत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या विद्यामंदिराचे विद्रूपीकरण होत असल्याची बाब खेदजनक असल्याची संतप्त प्रतिक्रीया माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, लोणी काळभोरचे अप्पर तहसील कार्यालय याच ठिकाणी होणार आहे. यासाठी या बेसिक सेंटरचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या प्रस्तावाचा निर्णय अद्याप झालेला नसल्याची माहिती मिळत आहे. येथे तहसिल कार्यालय झाल्यास इमारतीचा वापर योग्य कारणासाठी होईल आणि विद्रूपाकरण थांबेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मद्यपींवर कडक कारवाई करावी…
एकेकाळी ज्या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या. आता ते विद्यालय बंद पडून धूळ खात आहे. ही दुर्दैवी बाब आहे. हे विद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी पुरेसे प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे ओस पडलेल्या इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग होऊ लागला आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चोरट्यांवर व मद्यपींवर कडक कारवाई करावी.
– सचिन बळवंत काळभोर (लोणी काळभोर, ता. हवेली)
या विद्यालयातील ३ विद्यार्थी पोलिस उपअधीक्षक, १५ ते २० जन पोलीस उपनिरीक्षक तर ५ ते ७ जन शिक्षणअधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या विद्यालयाची परिस्थिती सुन्न करणारी आहे. या विद्यालयात २४ वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले असल्याने या ठिकाणी नाळ जोडली गेली आहे. या ठिकाणी लवकरात लवकर शासकीय कार्यालय सुरु होऊन नागरिकांना सुविधा मिळाव्यात. त्यामुळे या विद्यालयाशी जोडलेल्या आठवणी पुन्हा ताज्या होतील.
प्रा.कालिदास काळे (तत्कालीन शिक्षक)