पुणे : सदाशिव पेठेतील प्रसिद्ध खजिना विहीर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरीची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हे मंदिर २५० वर्षांपूर्वीचे आहे. चोरट्यांनी मंदिरातील कपाटाचे कुलूप तोडून देवाच्या मूर्ती आणि चांदीचे मखर चोरून नेले आहे. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गौरव ज्ञानेश्वर सिन्नरकर (वय ३८, सदाशिव पेठ खजिना विहिर चौक, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी आठ मार्चच्या रात्री मंदिरात प्रवेश करून जबरी चोरी केली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे आणि गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले. मंदिरातील कपाटाचेही कुलूप तोडले आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीची विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, चांदीची गणपतीची मूर्ती, तुळजाभवानीची पितळेची मूर्ती आणि भिंतीवर लावलेले चांदीचे मखर अशा एकूण ४१ हजार ५०० रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करत आहे. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक फरताडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुण्यातील जुन्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. मंदिरातील मूर्ती देखील अडीचशे वर्षे जुन्या आहेत. या मूर्ती चोरीला गेल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवण्यास सुरवात केली आहे.