मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात भस्मा आरतीदरम्यान गाभाऱ्यात भीषण आग लागली. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण होरपळून निघाल्याची माहिती मिळत आहे. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता. त्याचवेळी होळीमध्ये गुलाल टाकल्याने आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहातील फ्लेक्सनी पेट घेतला. सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
महाकालेश्वर हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. येथे रविवारी संध्याकाळी होळी उत्सवाला सुरुवात झाली. सर्वात आधी संध्याकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी बाबा महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी केली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आले. मंदिरात सोमवारी सकाळी भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात असतानाच आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे गाभाऱ्यात उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण गाभाऱ्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारामुळे गाभाऱ्यात अडकलेल्या पुजाऱ्यांसह १३ जण होरपळून निघाले.
दरम्यान, महाकालेश्वर मंदिरात होळीला बाबा महाकाल गुलाल अर्पण करतात आणि पुजारीही एकमेकांना रंग लावतात. या रंगांनी गर्भगृहाच्या भिंती खराब होऊ नयेत, यासाठी यंदा शिवलिंगावर प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले होते. शिवाय गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप लावण्यात आलेला आहे. गर्भगृहात एकमेकांवर रंगांचा वर्षाव होत असताना आरतीच्या थाळीत जळणाऱ्या कापूरवर गुलाल उधळला गेला, त्यामुळे आगीने पेट घेतला आणि गर्भगृाहातील फ्लेक्सनी पेट घेतला. मात्र, काही वेळातच आग आटोक्यात आली.
या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितलं की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आगीच्या घटनेमुळे पुजाऱ्यांसह काहीजणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची चौकशी समिती करणार आहे.