नवी दिल्ली : दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप ठेऊन ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यांना २८ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीचे सरकार कोण चालवणार, असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, केजरीवाल यांनी दिल्लीच्या जल मंत्रालयाशी संबंधित एक आदेश तुरुंगातूनच जारी केला आहे. त्यामुळे केजरीवाल हे तुरूंगातूनच सरकार चालवतील हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांना अटक केली असता त्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, तसा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे हा मार्ग आता आप पक्षाकडून अवलंबण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सरकार चालवावे किंवा दिल्लीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या विश्वासू आतिशी यांनी सरकार चालवावे यासह अनेक पर्यायांवर विचार करण्यात आला. मात्र, केजरीवाल यांच्या आदेशानंतर दिल्ली सरकार हे केजरीवाल तुरूंगातून चालवतील हे स्पष्ट झाले आहे. ईडीच्या कारवाईविरोधात ‘आप’ने मोठे आंदोलनही सुरू केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. मध्य दिल्लीतील भाजप मुख्यालय आणि ईडी कार्यालयाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगलविरोधी शस्त्रांनी सज्ज असलेले निमलष्करी दलाचे जवानही तेथे तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात अपील करत ईडीने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते. मात्र, होळीनिमित्त न्यायालय बंद असल्याने या याचिकेवर २७ मार्चपूर्वी सुनावणी होण्याची शक्यता नाही.