मुंबई : निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर त्यावर आक्षेप घेत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन छापून आले आहे. त्यामध्ये ‘निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे,’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पक्षाने हे निवेदन प्रसिद्ध केले आहे. परंतु या खटल्यामध्ये अंतिम निकालानुसार बदल होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात अजित पवार गटाकडेच घड्याळ हे चिन्ह राहू शकेल, याची शाश्वती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणीवेळी एक अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली होती. त्यामध्ये अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह विधानसभा निवडणुकांमध्ये वापरता येईल; मात्र, घड्याळ हे चिन्हाची जाहिरात देताना सदर विषय न्यायप्रविष्ट आहे अशा प्रकारची माहिती देणारे निवेदन राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील दैनिकातून प्रसिद्ध करावे असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन दैनिकामध्ये छापून आले आहे.
अजित पवार गटाने ‘घड्याळ’ या चिन्हाबाबत संभ्रम टाळण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निवेदन प्रसिद्ध करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली. ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे,’ असे त्यात नमूद करावे अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अजित पवारांना दिलेले चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. शरद पवार गटाची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. परंतु या खटल्यामध्ये अंतिम निकालानुसार बदल होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात अजित पवार गटाकडेच घड्याळ हे चिन्ह राहू शकेल, याची शाश्वती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.