पुणे : राष्ट्रवाद कॉंग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग सोनवणे यांनी नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तसेच अजित पवार यांच्या जवळचे मानले जाणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
अशातच आता शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. आगामी काळात अजित पवार गटातील बरेच नेते परत येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यावर ही इन्कमिंग आणखी वाढेल, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवार बारामतीमध्ये बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
माढ्याची जागा जाणकारांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी : शरद पवार
पुढे बोलताना म्हणाले, माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र माझी ही मागणी सर्वांनी ऐकली पाहिजे. चर्चा करूनच योग्य तो निर्णय होणार आहे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी आमच्याकडे लोक येतील. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचं प्रमाण जास्त झालेलं दिसेल असं शरद पवार म्हणाले.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपावर टीका
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे. विरोधी पक्षाच्या लोकांवर ईडीची कारवाई केली जात आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.