मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होत आहे. राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही, हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा भिडू जोडला जाण्याची शक्यता आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे. मात्र, यासाठी शिंदेंची सहमती आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् येथे ही बैठक सुरु आहे.
मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा मिळणार का, याबाबत चर्चा सुरु आहे. यापैकी नेमकी कोणती जागा मनसेला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु असताना महायुतीतील नेते अजित पवार यांची बैठकीला अनुपस्थिती आहे. महायुती लढत असलेल्या जागांपैकी भाजपने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. मनसे हा नवा भिडू महायुतीत दाखल झाल्यानंतर उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात महायुतीचा प्रचार, लोकसभा निवडणुकीची रणनीती यासंदर्भात चर्चा आजच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय राज ठाकरे महायुतीत आल्यास आक्रमकपणे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.