बारामती : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आधी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजितदादांविरोधीत भूमिका घेतली. त्यानंतर श्रीनिवास पवार आणि आता त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांच्या भूमिकेला विरोध केला आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत. आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. त्यांचे विरोधक देखील साहेबांचे नाव घेतात, असे शर्मिला पवार म्हणाल्या. आपल्याला फक्त साहेबांनाच विजयी करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
काटेवाडी येथील गावकऱ्यांशी संवाद साधताना शर्मिला पवार बोलत होत्या. शर्मिला पवार म्हणाल्या की, साहेबांनी आपल्यासाठी काय केले हा प्रश्न विचारणे म्हणजे आई-वडिलांनी माझ्यासाठी काय केले, असे विचारण्यासारखे आहे. कुटुंबात वडीलधारी व्यक्तींचे स्थान मोठे असते. आपण वडिलधाऱ्यांचा आदर करतो. साहेबांनी इतक्या वर्षात यशस्वीपणे कारभार केला. त्यांना आपण साथ दिली पाहिजे. कुणाला यश मिळते, यापेक्षा आपण सत्तेसाठी वाहवत जाणाऱ्यांच्या नव्हे तर समाजासाठी झटणाऱ्या नेत्याच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचे आहे.
निवडणुकीचा हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. कुटुंब म्हटले की भांड्याला भांडे लागते. पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही. आपण त्यावर मात करतो, तसा प्रयत्न आम्ही करत आहोत. लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचे नाही, असेही शर्मिला पवार म्हणाल्या.