राजस्थान : राजस्थानच्या अजमेरमध्ये मदार रेल्वे स्थानकाजवळ साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात जोरदार टक्कर झाली. या अपघातात साबरमती आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह ४ डबे रुळावरून घसरले. रात्री १.१० च्या सुमारास मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला. सुदैवाने जीवीतहानी टळली.
अपघाताबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेर येथे सोमवारी (ता. १८ मार्च) पहाटे साबरमती-आग्रा सुपरफास्टचे चार डबे रुळावरून घसरले. मदार रेल्वे स्थानकावर दुपारी १.०४ वाजता साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. लोको पायलटने ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेकही लावला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी अजमेर स्थानकात नेण्यात आले. झोपेत असताना अचानक मोठा आवाज आल्याचे प्रवाशांनी सांगितले. या घटनेनंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये रुळावरून घसरलेल्या डब्यांची तपासणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. या धडकेमुळे रेल्वेचे काही खांबही रेल्वेच्या वर पडले असून ते गॅस कटरच्या सहाय्याने कापले जात आहेत.
दरम्यान, अपघातानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस यांच्यासह अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रुळावरून घसरलेले डबे आणि इंजिन पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ट्रेन अजमेर रेल्वे स्थानकातून रात्री १२.५५ च्या सुमारास निघाली आणि काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना जोरदार धक्का बसला. सीटवर झोपलेली मुले, महिला आणि वृद्ध सीटवरून खाली पडले.