पुणे : आंबेगाव बु (ता. वेल्हा) येथील अनोळखी इसमाच्या खुनाचे गूढ उघडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पूर्व वैमनस्याचा राग मनात धरून मृतक राहुल प्रकाश रावत (वय २८, रा. इंद्रायणीनगर भोसरी) यांचा खून करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी सोमेश्वरवाडी (ता. हवेली) येथून अटक केली आहे.
संजय बाबुराव कडू-देशमुख (वय ३६, रा. कुराण बु !! ता. वेल्हा), धनंजय सदानंद ढमाले (वय ३२, रा. अथर्व आपार्टमेंट, विठ्ठल मंदिर जवळ नवी पेठ, ता. हवेली) आणि गणेश दत्तात्रय निवंगुणे (वय ४०, रा. आंबी, ता. वेल्हा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बु येथील कदावे – शिरकोली रस्त्यालगत एक अनोळखी इसम मृत अवस्थेत पडलेला असून त्याचा मृतदेह कुजलेला आहे. अशी माहिती वेल्हा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वेल्हा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, अनोळखी इसमाचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. आणि सदर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृत इसमास अत्यंत क्रूरपणे मारून त्याचे शीर धडावेगळे करून त्याचा डावा हात तोडून टाकलेला असल्याचे आढळून आले. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उगडकीस आणुन आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना हा अनोळखी मृतदेह हा राहुल रावत यांचा असल्याचे तपासनीस उघडकीस आले. तसेच तपास पथकातील पोलीस नाईक अमोल शेडगे यांना राहुल रावत यांचा खून आरोपी संजय कडू-देशमुख, धनंजय ढमाले आणि गणेश निवंगुणे यांनी केला असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना सोमेश्वरवाडी (ता. हवेली) येथून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी राहुल रावत याचा पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गणेश निवंगुणे यांच्या स्कॉर्पिओ गाडीत घालून आंबेगाव बु येथे बाजूला टाकून दिला होता. असे सांगितले. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी वेल्हा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब डोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार राजू मोमीन, दत्तात्रय तांबे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके आणि समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली आहे.