पुणे : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (ता. १६ ) रोजी घडली आहे. या घटनेने पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीब लतीफ इनामदार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, साकीब इनामदार आणि त्याची प्रेयसी यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रविवारी (ता. १६ ) सकाळी साडेदहा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर गेले. लॉजवर दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. काही दिवसांनीच प्रेयसीचा विवाह होणार होता. त्यावेळी तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे. मी जगून तरी काय करु? असे म्हणत तिच्या ओढणीने गळफास घेऊन तिच्या समोरच आत्महत्या केली.
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.