पुणे : कोंडवे धावडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युट्यूबवर व्हिडिओ पाहून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतः केली स्वतः ची प्रसूती आणि मग घरातच बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांना आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.
रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्म दिलेले दोन दिवसीय नवजात अर्भक ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बाळाच्या तब्येतीवर आयोग जातीने लक्ष देत आहे. नवजात बाळ सोसायटीच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर उपचारासाठी पोलीस या बाळाला रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
तसेच अल्पवयीन मुलगी गरोदर असताना ती तपासणीसाठी गेली तेव्हा तिची माहिती डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेला दिली आहे की नाही? याची जबाबदारी निश्चित करून डॉक्टरांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती देखील रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
बाळाला जन्म दिलेल्या अल्पवयीन मुलीवरही एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, हे बाळ तिनेच दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले होते . तिने युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केल्याचीही माहिती देखील तिने दिली.
दरम्यान, या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.