मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रोस कोड लागू होणार आहे. त्यामुळे शाळेत शिक्षकांना टी-शर्ट किंवा जीन्स पँट परिधान करता येणार नाही. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांना शाळा ठरवेल, अशा रंगाच्या ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक असेल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली.
शाळांमध्ये ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे घालून शाळेत येता येणार नाही. शाळेतील सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने निश्चित केलेले कपडे परिधान करावे लागतील. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव असावा. तर पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन असावा. तसेच गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये, या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
एकीकडे राज्य सरकारने प्रत्येक शाळेतील शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू केला असला, तरी दुसरीकडे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr)आणि मराठीत टी असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. लावण्यात येते. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.