नवी दिल्ली : अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरता? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले आहे. अजित पवार गटाने ‘घड्याळ’ व्यतिरिक्त दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सांगितले.
अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना घड्याळ चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शरद पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, अधिकृत गट शरद पवार यांच्याशी ऐतिहासिकदृष्ट्या संबंधित असलेले ‘घड्याळ’ चिन्ह आणि प्रचार साहित्यात ज्येष्ठ पवारांची नावे आणि छायाचित्रे वापरत आहे. सिंघवी यांनी छगन भुजबळ यांनी केलेले विधान वाचून दाखवले.
दरम्यान, तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर तुमची छायाचित्रे वापरा? अशी विचारणा अजित पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांना न्यायमूर्ती कांत यांनी केली. मनिंदर सिंग म्हणाले की, पक्ष ते करत नाही आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी केले असावे. मनिंदर पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांद्वारे सर्व सोशल मीडिया पोस्टर्सवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही, तेव्हा खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की पक्षाने आपल्या सदस्यांना शिस्त लावणे आवश्यक आहे.
आम्हाला तुमच्याकडून अत्यंत स्पष्ट आणि बिनशर्त हमी हवी आहे की तुम्ही त्यांचे नाव, फोटो इ. वापरणार नाही. यात कोणतेही ओव्हरलॅप होऊ शकत नाही,” असे न्यायमूर्ती कांत यांनी सिंग यांना सांगितले. सिंग यांनी याबाबत हमीपत्र दाखल करण्याचे मान्य केले.