पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यातील एका मोठ्या कंपनीवर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदरांची १२५ कोटींमध्ये फसवणूक करणाऱ्या पुण्यातील विनोद खुटे याच्यावर कारवाई झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजची ३८ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी करत ईडीने बँकेतील २३ कोटींची रक्कम सुद्धा गोठवली आहे.
तपास एजन्सीने काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून खुटे याने १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप केला आहे. खुटे फसवणूक करुन दुबईत फरार झाला आहे. दुबईत त्याचे अनेक फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ईडीने काही महिन्यांपूर्वी विनोद खुटे याच्या कंपनीच्या पुणे आणि अहमदनगर येथील कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी त्या कंपनीची १८.५४ कोटी रुपयांची बँकेतील रक्कम गोठवली होती.
विनोद कुटे याचा व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यात क्रिप्टो एक्स्चेंजसह वॉलेट सेवांचाही समावेश आहे. तसेच हवालाद्वारे तो परदेशात पैसे पाठवतो. तसेच तो ई-कॉमर्स शॉपिंग पोर्टलद्वारे उत्पादने विकतो. यामुळे ईडीचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि कारवाईला सुरुवात झाली.
पुणे शहरात विनोद खुटे याने धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तयार केली. त्याने गुंतवणुकदारांना चांगल्या व्याजाचे आमिष दाखवले. इतर ठिकाणी मिळत असलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज दिले. यामुळे असंख्य गुंतवणूकदारांनी त्याच्या पतपेढीत मोठी गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्याने हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली. या प्रकरणात विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पीतांबर अनारसे, अजिंक्य बदाधे आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.