पुणे : पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. प्रत्यक्षात या अफवा असल्याचे खुद्द शरद पवारांनीच सांगितल्यामुळे या चर्चांना ब्रेक लागला. या पार्श्वभूमीवर निलेश लंकेंचे जवळचे मित्र आणि आमदार सुनील शेळके यांनी खळबळजनक दावा केला आहे. महाविकास आघाडी लंकेंचा बळी घेतेय. लंकेना दक्षिण नगरमधून लोकसभा लढायची अजिबात इच्छा नाही. पण रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्यामुळेच जाणीवपूर्वक त्यांना महाविकास आघाडीकडून आग्रह केला जात आहे, असा दावा सुनिल शेळकेनीं केला आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून निलेश लंकेच्या मागे अनेकजण लागले आहेत. तसेच, निलेश लंकेंना दक्षिण नगरच्या लोकसभेसाठी उभं राहण्याची गळ घातली जात आहे. महायुतीची दक्षिण नगरची जागा सध्या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे ती जागा त्यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे. जर ती जागा भाजपकडेच जाणार असेल आणि तिथे महाविकास आघाडीसाठी पर्याय शिल्लक नव्हता. ज्यांना पर्याय म्हणून उभे केले होते, त्या रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळेच निलेश लकेंना गळ घालून तिथून लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाग पाडलं जात आहे. पण मला विश्वास आहे, निलेश लंके कुठेच जाणार नाहीत, ते दादांसोबतच राहतील, असे सुनील शेळके म्हणाले.
महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंचा बळी दिला जात आहे, असा घणाघात शेळके यांनी केला आहे. ते म्हणाले की, “दक्षिण नगरची जागा महायुतीमध्ये भाजपला मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रोहित पवारांना उभं राहण्यासाठी आग्रह केला होता. पण तेथील परिस्थिती डोळ्यांनी पाहिल्यानंतर रोहित पवारांनी माघार घेत, लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना गळ घालून महाविकास आघाडीकडून लोकसभा लढवण्यासाठी बळी दिला जात आहे. महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंची समजूत घातली जात आहे. तुम्ही नाहीतर निदान कुटुंबातील कोणालातरी उभे करा, अशी गळ घातली जात आहे.
मावळातील मेळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडवल्याचा आरोप करत, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना चांगलेच सुनावले होते. याबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले की, शरद पवार आमचे श्रद्धास्थान आहेत. इथल्या स्थानिक मंडळींनी त्यांना काहीतरी चुकीची माहिती दिली. त्यातून त्यांच्या मनात गैरसमज पसरले. मात्र, आजही आमच्या मनात त्यांच्याविषयी तेवढाच आदर आहे. मी शरद पवारांची लवकरच भेट घेणार आहे. त्यांनी वडिलकीच्या नात्याने नेहमीच मला समजावले आहे. पण मार्गदर्शनासाठी मी नक्कीच भेट घेईन.
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल, असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.