पिंपरी : परिसरातील इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. तळवडेतील त्रिवेणीनगर येथील टॉवर लाइन येथे सोमवारी (ता. ११) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचे १४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या ६८ जवानांनी अथक प्रयत्नांती आगीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाने दिलेल्या अधिक माहितीनुसार, नम्रता इलेक्ट्रिक्स अँड केबल हाऊस नावाचे इलेक्ट्रिक दुकानाचे गोदाम टॉवरलाईनजवळ आहे. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या गोदामामध्ये आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यासह टाटा कंपनी, बजाज कंपनी तसेच एमआयडीसीचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. एकूण १४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या ६८ जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, आग मोठ्या प्रमाणात भडकलेली असल्याने गोदामातून धुराचे लोट येत होते. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने साहित्य बाजूला करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग लागली त्यावेळी गोदामात कोणीही नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोदामामध्ये इलेक्ट्रिक केबल, बोर्ड आणि इतर साहित्य होते. हे साहित्य आगीत खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.