पुणे : लोकसभा निवडणुकांपूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटील प्रचंड इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी आढळराव प्रयत्नशील आहेत. यासाठीच राजकारणातील त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या दिलीप मोहितेंची आढळरावांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आपापसांतील वैर संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी माझा आढळराव पाटील यांना विरोध कायम आहे. भेट म्हणजे मनोमीलन नव्हे’, अशी भूमिका राष्ट्रवादीचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी घेतली आहे. मोहितेंचा नाराजीचा सूर कायम आहे.
खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिलीप मोहिते पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोहिते यांच्यासमवेत झालेल्या भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. या पार्श्वभूमीवर दिलीप मोहिते म्हणाले, की शिंदे गटाचे शिवाजी आढळराव मला भेटले म्हणजे आमचे मनोमिलन झाले, असे अर्थ काढू नका. आढळरावांच्या पक्ष प्रवेशाला माझा कायमच विरोध आहे.
शरद पवारांनी जे केले तेच अजित पवार करणार असतील तर राजकारण सोडून दिलेले बरे, असे म्हणून मोहितेंनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांवरही निशाणा साधला. आजवर शरद पवारांनी जे केलं आता तेच अजित पवार करू पाहतायेत का? हे सगळं ठरवून सुरू आहे का? आम्हाला विश्वासात न घेता का केलं जातंय? आम्हाला राजकारणातील काही कळत नाही, असं अजित पवारांना वाटतंय का? असं म्हणत मोहितेंनी अजित पवारांना लक्ष केलं.
मोहिते म्हणाले की, आता मला कोणते पद मिळेल असे वाटत नाही, जे मिळालं ते पुरेसं आहे. त्यामुळं आढळरावांचा प्रचार करायची वेळ आली तर राजकारण सोडून देईन. शिवाजीराव आढळराव पाटील आणि माझे मतेभद अगदी टोकाचे आहेत. शिवाजीराव मला उमेदवार म्हणून भेटीला आलेले नाहीत. निवडणुकीला मला मदत करा असेही ते म्हणालेले नाहीत. आता उमेदवारी मिळेल अशी शक्यता असल्याने त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यात उमेदवारीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार दिलीप वळसे पाटील यांना आहेत. त्यामुळे एखाद्याला उमेदवारी देण्याअगोदर त्याने पक्षात राहून काम करणे गरजेचे आहे. ऐनवेळी उमेदवार उभा केला तर निवडून येत नाही. याबाबत मला पक्षाकडून सतत डावलण्यात आले आहे. पक्षाने मला आढळराव यांचा प्रचार करण्यास सांगितले तर मी राजकारण सोडून घरी बसेन.
दरम्यान, शिवाजी आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या दिलीप मोहितेंची शनिवारी घरी जाऊन भेट घेतली आणि भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मोहितेंसोबतचे वैर मी घरी जाऊन संपवले, असं दाखवून आढळराव राष्ट्रवादी काँगेसमधील नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करत होते. पण या भेटीतून आढळरावांच्या हाती काही लागलंय असं दिसत नाही. कारण दिलीप मोहितेंनी शनिवारच्या भेटीतून आमचं मनोमिलन झालं नसल्याचं स्पष्ट केलंय.