मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाचा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच दौरा केला असून त्यांच्या शाखेला भेट दिली होती. यावेळी रवींद्र वायकर यांनी ठाकरेंचं स्वागत केलं होतं. आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले की, गेली ५० वर्ष मी शिवसेनेत जे पडेल ते काम केलेल आहे. चार वेळा नगरसेवक, तीन वेळ आमदार हे पर्यायाने आले. ज्यावेळी मी आता पक्षप्रवेश करतोय, त्या मागचं कारण वेगळ आहे. कोविडमध्ये कामे झाली नाहीत. पण आता आरेतील रस्त्यासाठी पैसे पाहिजेत. लोक रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी रडतायत. यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय सोडवाता येत नाहीत. लोक आपल्याला निवडून देतात. आपण काम केलं पाहिजे. असं वायकर म्हणाले.
पुढे बोलताना वायकर म्हणाले, देशात भाजपची सत्ता असून पंतप्रधान मोदी चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. सर्व विकासकामांची प्रश्न सोडवण्यासाठी मी इकडे आलो आहे. प्रश्न सोडवले नाही तर, मग मी लोकांना उत्तर देऊ शकणार नाही. यासाठीच मी इथे आलो आहे. असंही रवींद्र वायकर म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वायकरांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. गेले अनेक वर्ष शिवसेनेचे काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. अनेक वर्षे काम करत आलो. आज संपूर्ण परिवार त्यांचा इकडे उपस्थित आहे. त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. वायकर यांनी आपल्या मतदार संघातील प्रश्न मला सांगितले. देशात विकासाच पर्व सुरु आहे. विकास कामाचा परिणाम वायकरांवर झाला आहे. मतदाताना न्याय देणे अपेक्षित असतं. नागरिकांचे प्रश्न सोडवणे आवश्यक असतात. वायकरांना आता विश्वास निर्माण झाला आहे आणि म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
कोण आहेत रवींद्र वायकर?
आमदार रवींद्र वायकर यांची नजिकच्या काळात नेते पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड, हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वायकर यांच्यावर दिली होती. वायकर यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. 1992 मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. तर वायकर पालिकेत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती.