पुणे : दिवाळी अगदी आठवड्यावर येवून ठेपली आहे. राज्यातील मोठ्या शहरात कामाला असणारे चाकरमानी किंवा विद्यार्थी (Students) घरी जाण्याचं नियोजन करीत आहेत. पण ऐवढ्यातचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणारी माहिती पुढे येत आहे.
दिवाळी निमित्त तुम्ही एसटी बसने प्रवास करण्याचं नियोजन करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण रेल्वेचं आरक्षण वेळेवर मिळणं कठीण झालं आहे कारण तीन महिन्यांपूर्वीचं आरक्षित तिकीट संपले आहेत. त्यात आता एसटी बसचा पर्याय होता पण तिकीट वाढीमुळे आता त्यावरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एसटी बसच्या तिकीट दरात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तिकीटांत होणार ही वाढ फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. एसटी बसच्या तिकिटांवरील वाढ ही 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर म्हणजे दहा दिवसांसाठी असणार आहे.
नवीन भाडेवाढ ही परिवर्तन, निमआरामी हिरकणी , शिवशाही आणि स्लिपर कोच बसेससाठी लागू असणार आहे. तरी एसटी महामंडळाचे महसूल तोट्यात असल्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दिवाळीच्या काळात एसटी बसेसला जास्त गर्दी असते. या गर्दीच्या हंगामामध्ये महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय हा पासधारकांना लागू नसणार आहे. मासिक आणि विद्यार्थी पासेसना ही भाडेवाढ लागू नाही.