मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात घेतलेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असे त्यांनी सांगितले. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता का? तर नक्कीच ठरला होता. मात्र पहिले 105 ज्यांचे आहेत, त्यांचा हा सन्मान होता. शेवटच्या दिवशी मातोश्रीवर भारतीय जनता पार्टीकडून ऑफर आली होती. पण कोणीही बोलणीच केली नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंना शिंदे विचारायला गेले, तेव्हा मी बोलणी करणार नाही. तुम्हाला करायची तर करा, असे त्यांनी म्हटले. कारण शरद पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने उद्धव ठाकरेंचे विचार बदलले, असा गौप्यस्फोट आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.