मालेगाव : मालेगावच्या दातारनगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यालाला एका तेरा वर्षीय मुलाने साठलेल्या सांडपाण्यात फेकून दिल्याने निष्पाप बालकाच्या नाका-तोंडात पाणी जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाण्यात फेकून दिल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे हा प्रकार निदर्शनास आला.
हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दातारनगर भागात राहणारी चार लहान मुले विधिसंघर्षित १३ वर्षीय मुलाबरोबर खेळत होती. खेळत असताना ही मुले सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काही वेळ येथे ही बालके घुटमळली. यानंतर संशयित १३ वर्षीय टोपी घातलेल्या मुलाने हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन (रा. दातारनगर, रमजानपुरा) याला उचलून सांडपाण्याच्या डबक्यात फेकून दिले. यानंतर तो मुलगा पळून गेला. हलवाई मशीद परिसरातील यंत्रमाग कारखान्याजवळ हा प्रकार घडला.
दरम्यान, पाण्यात फेकलेल्या लहान मुलाला बाहेर काढण्यासाठी एका मुलाने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा पाय फसल्याने तो पुन्हा काठावर आला. याच कालावधीत सांडपाण्यात बुडून या चिमुलक्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कळताच बालकाच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरुन सांडपाण्याच्या डबक्याजवळ, कारखान्यात व अन्यत्र सीसीटीव्ही आहेत का, याची चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी कारखान्याचा सीसीटीव्ही तपासला असता ही घटना निदर्शनास आली. ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बालकाचा मृतदेह पाण्यातून काढत पंचनामा केला.
पंचनाम्यानंतर बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात कब्रस्थान येथे दफनविधी करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात पवारवाडी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व उर्वरित बालकांकडून माहिती घेऊन तपास करीत आहेत.