अरुण भोई
दौंड : मलठण (ता. दौंड) गावठाण हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नेमणुकीला असलेले शिक्षक चॉंद इनामदार यांनी मंगळवारी (ता. ५) अचानकपणे दांडी मारल्याने शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ताटकळत बसावे लागले. या शाळेत पूर्ण वेळ शिक्षक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत. पैकी एक शिक्षक रजेवर होते आणि नेमणूक केलेले शिक्षक चॉंद इनामदार हे शाळेमध्ये न आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. याबाबत ग्रामस्थांनी विचारले असता, शाळेला सुट्टी असल्याचे इनामदार यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शिक्षण समिती अध्यक्ष अजय लोंढे यांना सांगितले.
दरम्यान, या प्रकाराबाबत शाळेचे केंद्रप्रमुख महेश केंजळे यांना विचारले असता, शाळेला कोणतीही सुट्टी नाही. शिक्षकांनी अचानक दांडी मारणे, हे धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी गेली एक वर्षापासून शिक्षण समितीची मासिक बैठक घेतली गेली नाही. शिक्षण समितीच्या अध्यक्षांकडून कोऱ्या चेकवर सही घेतली गेली आहे, असे मत शिक्षण समितीचे अध्यक्ष अजय लोंढे यांनी व्यक्त केले.
या वेळी ग्रामस्थ व पालकांकडून संबंधित शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केंद्रप्रमुख व वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचा व पंचायत समितीचा शिक्षण विभाग करतोय तरी काय? असा सवाल यामुळे निर्माण होत आहे. ‘आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय!’ या म्हणीप्रमाणे शिक्षण विभागाचा कारभार सुरू असल्याची परिस्थिती आहे. या वेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व पालक उपस्थित होते.