युनूस तांबोळी
शिरूर : महाराष्ट्र शासनाने शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात शासकीय गटात वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे ११ लाखांचे पारितोषिक पटकावले, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा’ असा नावलौकिक असलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने आपली उच्चतम गुणवत्ता राखत याही स्पर्धेत बाजी मारली.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांची शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात आले. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली होती. शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास अशा अनेकविध निकषांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला होता.
शाळेत गुणवत्ता विकास वाढीसाठी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एन.एम.एम.एस. परीक्षा, ऑलिंपियाड परीक्षा, विषय प्राविण्य परीक्षा यांमध्ये शाळेने विक्रमी यश संपादन केले आहे. तसेच विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ जिल्हास्तरावरच नव्हे तर राज्यस्तरावर देखील यश संपादन करण्याची परंपरा अखंडित राखलेली आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वाबळे, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी शाळेच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.