बारामती: “जर बारामतीमध्ये दहशतीचे आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मग मी बघतो”, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचा पुतण्या असलेल्या युगेंद्र पवार यांनी थेट आव्हान दिले आहे. युगेंद्र यांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारांसाठी अनेक गावांचे दौरे सुरु केले आहेत. आज उंडवडीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या गटासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची जोरदार चर्चा सध्या बारामती सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे. सध्या बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही. कोणी तुम्हाला फोन करून धमकावले जात असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मी बघतो, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे मैदानात असणार आहेत. दरम्यान, अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत.