चंदीगड: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिरोमणी अकाली दल आणि शिरोमणी अकाली दल एकत्र आले आहेत. शिरोमणी अकाली दल युनायटेडचे अध्यक्ष सुखदेव सिंह धिंडसा यांनी आपला पक्ष अकाली दलात विलीन केला आहे. सुखदेव सिंह धिंडसा हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. सुखबीर बादल यांच्यामुळे नाराज होऊन त्यांनी अकाली दलापासून वेगळे होऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि भारतीय जनता पक्षासोबत युतीही केली होती.
असे झाले होते वेगळे
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह धिंडसा यांच्या नेतृत्वाखाली अकाली नेत्यांनी शिरोमणी अकाली दल (युनायटेड) पक्ष स्थापन केला होता. त्यापूर्वी अकाली दल पक्षात असताना धिंडसा यांनी इतर नेत्यांसह 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवासाठी सुखबीर बादल यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, सुखबीर बादल यांनी नकार दिला. तेव्हा माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी धिंडसा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, धिंडसा यांना ते मान्य झाले नाही.
रणजित सिंग ब्रह्मपुरा, जगमीत ब्रार, रणजित सिंग तलवंडी आणि न्यायमूर्ती निर्मल सिंग यांसारख्या अनेक दिग्गजांनी संयुक्त अकाली दलात प्रवेश केला होता. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन झाल्यामुळे अकाली दलाला केवळ तीन जागा जिंकता आल्या आणि त्याचा फायदा इतर पक्षांना झाला. दोन्ही पक्षांमधील ऐक्यामुळे पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. ऐक्यानंतर अकाली दल आणि भाजपमध्ये आणखी एक युती होऊ शकते आणि सुखदेवसिंग धिंडसा हे या आघाडीचे शिल्पकार ठरू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.