मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल रमेश बैस यांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेलद्वारे करण्यात आली होती. याबाबत राहुल नार्वेकरांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई- मेल हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या इमेल आयडीवरून राज्यपालांना ईमेलही पाठवण्यात आला आहे.
या मेलमध्ये जे आमदार सभागृहात नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेलद्वारे करण्यात आली होती. नार्वेकर यांना राज्यपाल कार्यालयाने विचारणा केली असता त्यांनी असा कोणताही ईमेल पाठवला नसल्याचे सांगितले, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसात धाव घेत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.