पुणे : छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्याचे काम खासदार अमोल कोल्हे त्यांच्या कलेच्या माध्यमातून करत आहेत. मात्र, कोणी बोलून त्यांची किंमत कमी होणार नाही. त्यांची किंमत जनता ठरवत असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या गटातील सर्वच आमदारांच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो दिसतील असा दावाही त्यांनी केला आहे.
पुढे म्हणले, अजित दादा डिस्टर्ब आहेत की नाही माहित नाही, मात्र या सर्व प्रकरणामुळे जनता डिस्टर्ब आहे. ते नीट करण्याचं काम आता सुरू आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार भाजपच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जावे लागते की काय? यासाठी चिंतेत आहेत. काही आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार नाही, तर काही आमदार तयार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात लोकसभा निवडणुकीनंतर हे आमदार शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
आमदार निलेश लंके यांच्या पोस्टरवर शरद पवार यांचे फोटो दिसत आहेत. हळूहळू साहेबांचे फोटो सर्वच आमदारांच्या पोस्टवर दिसून येतील असंही रोहित पवार म्हणाले. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून नीलेश लंके यांना मदत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नीलेश लंके साहेबांसोबत आले तर आश्चर्य वाटायला नको, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.