कात्रज : पुणेकरांचे प्राणीप्रेम वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील दत्तक योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनानंतर प्राणिमित्रांकडून प्राणी दत्तक घेण्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. चालू वर्ष २०२३-२४ मध्ये मिळालेली मदत ही मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट आहे.
कोरोनानंतर २०२०-२१ मध्ये १२ प्राण्यांना दत्तक घेण्यात आले होते. यामधून ३२ हजार १९० रुपयांचे उत्पन्न प्राणिसंग्रहालयाला मिळाले होते. २०२१-२२ मध्ये १० प्राण्यांच्या माध्यमांतून ८४ हजार ३०५ तर चालू वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत ३९ प्राण्यांच्या माध्यमांतून दोन लाख ४३ हजार ६१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
दत्तक योजना कशासाठी?
– लोकांकडून घेण्यात येणाऱ्या रकमेत प्राण्यांचे खाद्य पूर्ण होत नाही.
– प्राण्यांवरील प्रेम वाढावे, प्राण्यांविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा.
– प्रियजनांच्या स्मृतिप्रित्यर्थ किंवा लहान मुलांच्या आवडीच्या प्राण्यांचे प्रायोजकत्व घेण्यास लोक जास्त अनुकूल.
दत्तक योजनेतील प्राण्यांना किती खर्च
– दत्तक योजनेसाठी कोल्ह्याला दिवसाला १३५ रुपये.
– हत्तीला दिवसाला १५०० रुपये.
– कोरोनाच्या आधी दत्तक योजनेतून मिळणारे उत्पन्न वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत.
– कोरोनानंतर ते ३२ हजार रुपयांपर्यंत खाली आले अशी आहे.
प्राणी दत्तक योजना
– एखादी व्यक्ती, संस्था किंवा उद्योग समूह प्राणी संग्रहालयातील कोणत्याही प्राण्याला त्यांच्यावरील प्रेमापोटी दत्तक घेऊ शकते.
– या माध्यमातून प्राण्यांचे खाद्य ते प्रायोजित करू शकतात
– कोणताही प्राणी किंवा प्राण्यांचा समूह एक दिवसांपासून एक वर्षांपर्यंत आणि एक वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत दत्तक घेता येतो.
– दत्तक योजनेतून मिळालेल्या रकमेचा वापर प्राण्यांसाठी पोषक अन्नपुरवठा, वैद्यकीय उपचार व योग्य काळजी घेण्यासाठी करण्यात येतो.
– प्राणी संग्रहालयाच्या नियमांच्या अधीन राहून हे सर्व करण्यात येते.
– प्रायोजकाकडून प्राणी दत्तक योजनेचा निधी केवळ चेक किंवा ड्राफ्टच्या साहाय्याने देण्याची सोय.
प्राण्यांविषयीचे प्रेम वाढावे हा उद्देश
कात्रज प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव म्हणाले की, दत्तक योजनेतून उत्पन्न मिळविणे हा प्राथमिक उद्देश नाही. वन्यजीव संवर्धनामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश व्हावा, त्यांचे प्राण्यांविषयीचे प्रेम वाढावे हा या योजनेमागील उद्देश आहे. अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभागी होत लोकसहभाग वाढवावा अशी अपेक्षा आहे.