पुणे प्राईम न्यूज डेस्क: लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला आई-बाप व्हावं असं वाटत असतं. हा एकप्रकारे जीवनशैलीचाच भाग बनला आहे. असे असताना जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा मात्र बाळाची विशेष काळजी घेणे गरजेचे बनते. पण नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची हे अनेकांना माहिती नसते. परिणामी, काही अडचणींना सामोरे जावे लागते.
बाळंतपण व त्यानंतरचे 6 आठवडे आई आणि बाळाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. जन्मलेल्या बाळाची काळजी नीट न घेतल्यास अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. परिणामी, काही वेळेस अर्भकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. बाळ जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासांत आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे बाळाचे पोषण तर होतेच पण त्याचबरोबर त्याची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
मातेचे पोट लवकर कमी होते आणि तिच्या अंगावर जाणे लवकर कमी होते. जास्त वेळा अंगावर पाजल्याने आईच्या दुधाचे प्रमाण वाढते. अंगावर पिताना आईच्या कुशीची बाळाला उबही मिळते. लवकर स्तनपानाचा सल्ला प्रत्येक मातेला द्यायलाच हवा. आईचे दूध हे तिच्या शरीरात गरोदरपणातच तयार होते.
बाळंतीण झाल्यानंतर 2-3 दिवस ते चिकासारखे घट्ट असते. बाळाला हे पहिले चिकाचे दूध मिळणे अत्यंत गरजेचं आहे. कारण यातूनच बाळाला पहिली रोगप्रतिबंधक शक्ती मिळते. आईच्या दुधात आवश्यक ती सर्व सत्त्वे असतात. त्यात बाळाला आवश्यक तेवढे पाणीदेखील असते. जुलाब आणि न्यूमोनियासारख्या रोगांपासून यामुळे बाळाचे सहज संरक्षण होते.