पुणे : पुण्यातील खडकी परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मुलावर धारधार शस्त्राने वार केल्याच घटना घडली. यामध्ये खडकी येथील दर्गा वसाहतमध्ये राहणारा १५ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मदचे वडील शाह आलम जुमान शाह (वय ४२) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आलम जुमान शाह यांचा मुलगा रविवारी खडकी बाजार परिसरातील मैदानात रविवारी दुपारी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळताना त्याचा आरोपी मुलाशी वाद झाला. आरोपी मुलाने त्याच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि आरोपी तेथून पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.