लोणी काळभोर : हवेली तालुका खरेदी-विक्री संघावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची १ कोटी २० लाख रुपये कर्ज देणी थकबाकी असल्याने, खरेदी-विक्री संघाच्या मालकीचे प्लॉट हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लिलावापोटी विक्री झाले आहेत. ते मर्जीतील बिल्डरला लागेबांधे म्हणून विक्री झालेले नाहीत. या प्लॉटच्या लिलावाची कार्यवाही झाली तेव्हा खरेदी संघावर संचालक कोण होते? त्यावेळी आपण कोणाची कारकूनी करत होता? त्यावेळी आपले नेते कोण होते? आपण बाजार समितीचे सभापती झाल्यानंतर आपला अर्थिक उत्कर्ष कसा झाला? संपूर्ण हवेली तालुका व जिल्ह्याने हे पाहिले आहे. विरोधकांचे सर्व आरोप म्हणजे ‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को…’ म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वेळी नवा नेता शोधून राजकीय दुकान चालविणाऱ्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारु नयेत, अशी शेलकी टीका प्रकाश जगताप यांचे नाव घेऊन माधवअण्णा काळभोर यांनी केली.
यशवंत कारखान्याच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तसेच हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप यांनी माधव काळभोर व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या आरोपांना खुलासा देऊन आरोपांनीच प्रतिउत्तर दिले आहे. या वेळी बोलताना माधवराव काळभोर म्हणाले की, आपली संपूर्ण कारकीर्द भ्रष्ट करुन जनतेला नैतिकता सांगणाऱ्या प्रकाश जगताप यांचा खरा मुखवटा तालुका जाणून आहे. त्यांनी वेळोवेळी कुणाचे बोट धरुन कुणाच्या पाठीत कसा खंजीर खुपसला, हे कारस्थान तालुक्याला माहित आहे. एकदा स्वार्थासाठी गुरू मानणे व स्वार्थ संपला की, गुरुदक्षिणेची फेड खंजीर खुपसून करणे हे त्यांची खासियत आहे. ते कोणाच्या बोटाला धरुन मोठे झाले, काय धंदे केले हे माहिती नसण्याइतकी जनता दुधखुळी नक्कीच नाही.
पुढे बोलताना काळभोर म्हणाले की, आपला पू्र्व इतिहास काय आहे, आपण किती जणांना रस्त्यावर आणले लावले आहे, आपला प्रामाणिकपणा किती आहे, हे प्रत्येक वेळी जिल्हा बॅंक, बाजार समितीला दिसून आला आहे. आपण सभापती झाल्यानंतर आपला इतका अर्थिक उत्कर्ष कसा झाला, हे सुज्ञ जनता ओळखून आहे. आपले कर्तृत्व असे की आपण बाजार समितीला बरखास्त करण्याची परिस्थिती आणून ठेवली. आपल्या कारकिर्दीत मांजरी बाजार समितीसाठी जमीन खरेदीसाठी काय हातचे राखले, बाजार समिती फर्निचर घोटाळा, डांबरीकरणात खोटे बिल वसुली करणे, बाजार समिती जागा खरेदी कमी दराने शक्य असताना जास्त दराने खरेदी करायला लावणे, असा निष्कर्ष मुलानी समितीने आपल्यावर ठेवला आहे.
माधव काळभोर म्हणाले की, ‘आपला उद्देश फक्त सहकारी संस्था ओरबाडणे हा आहे. आपण स्वतः आरशापुढे उभे राहून आपण काय आहोत हे पहावे, मग लोकांना आपले तत्त्वज्ञान शिकवावे. आपल्या सबंध आयुष्यात काय कारनामे कोणासोबत केले आहेत, हे अधिक सांगण्याची वेळ आणू नये, अशा शब्दांत त्यांनी प्रकाश जगताप यांच्यावर थेट निशाण साधला.