पुणे : नातीला भेटायला गेल्यानंतर भेटू न देता उलट धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचा मानसिक धक्का बसल्याने आजोबांची चार वर्षांपूर्वी इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी ; घटस्फोटित सुनेच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव सरोदिया असे आत्महत्या केलेल्या आजोबांचे नाव आहे. याप्रकरणी संदीप नामदेव सरोदिया (वय ५२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी शालिनी उर्फ शिवानी, सासू मनीलता शर्मा आणि मेहुणा शेखर शर्मा (तिघेही रा. बाणेर, पुणे) असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सरोदिया हे एक न्यायाधीश आहेत. संदीप सरोदिया आणि शालिनी यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. संदीप आणि शालिनी यांच्यात कौटुंबिक वादातून घटस्फोट झाला आहे.
संदीप सरोदिया यांचे वडील नामदेव हे नोव्हेंबर २०१८ मध्ये नातीला भेटण्यासाठी विभक्त झालेल्या सुनेच्या घरी बाणेरला गेले होते. त्या वेळी नामदेव यांना धक्काबुक्की करुन घराबाहेर काढण्यात आले होते. नातीला भेटण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, आरोपींनी त्यांना भेटू दिले नाही. नामदेव यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांनी इमारतीतील चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.
दरम्यान, नामदेव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी चिठ्ठी तपासणीसाठी पाठविण्यात आली होती. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेतील अहवालनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप सरोदिया यांनी नुकतीच चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी शालिनी उर्फ शिवानी, सासू मनीलता शर्मा आणि मेहुणा शेखर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.