लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीत मागील दहा ते बारा वर्षापासुन चालु असलेल्या इंधन चोरीच्या काळ्या साम्राज्यातील एका बड्या माश्याला लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी (ता. 11) रात्री उशीरा अटक केली. प्रविण मडखांबे हे त्या बड्या माश्याचे नाव असुन, लोणी काळभोर पोलिसांनी चार दिवसापुर्वी प्रविण मडखांबे शी संबधीत असलेल्या कदमवाकस्ती हद्दीतील इंधन चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन दोन टँकरसह तब्बल ८० लाखांचा ऐवज जप्त केला होता.
लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीत इंधन चोरी होत असल्याची माहिती असुनही, मागिल दहा ते बारा वर्षाच्या काळात पोलिसांनी केलेल्या कारवाया या लुटुपुटुच्या कारवाया ठरल्या होत्या. मात्र लोणी काळभोरचे नुतन वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी इंधन माफियांचे कंबरडे मोडण्याच्या हेतुने पाच दिवसापुर्वी कदमवाकस्ती हद्दीतील इंधन चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन, दोन टँकरसह ८० लाखांचा ऐवज जप्त केला होता. तर या कारवाईत पोलिसांनी इंधन चोरीच्या अड्ड्याचा मालक व अड्डा चालत असलेल्या जमिनीच्या मालकासह तब्बल सात जणांना अटक केली होती.
दरम्यान इंधन चोरी प्रकरणात वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट प्रविण मडखांबेला अटक केल्याने, पुर्व हवेलीमधील इंधन माफियात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सुत्रांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसात या व्यवसायातील आनखी कांही बडे माश्यांना पोलिस गळ टाकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास बारा वर्षापुर्वी तत्कालिनपोलिस निरीक्षक सुहास गरुड यांच्यानंतर पुन्हा एकदा लोणी काळभोरच्या नागरीकांना एक डॅसिंग अधिकारी व त्यांची सिंघम कामगिरी पहायला मिळणार आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी पाच दिवसापुर्वी धिरज विठ्ठल काळभोर (वय -३६ शेती रा. कदमवाकवस्ती ता हवेली) या इंधन माफियासह अमिर मलिक शेख (वय-३२, धंदा ड्रायव्हर रा. कदमवाकवस्ती लोणीकाळभोर, मुळ गाव मु. पो पिंपळे (आर) ता. बार्शी जि सोलापुर), सचिन भाऊराव सुरवसे (वय-३० धंदा हेल्पर रा. सिद्राममळा, लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे मुळे रा भाळवणी जेऊर ता करमाळा), विजय मारुती जगताप (वय-५२ धंदा- व्यवसाय रा. अंबरनाथ मंदीराजवळ ता हवेली), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय ४१ ड्रायव्हर रा. संभाजी नगर लोणीकाळभोर), इसाक इस्माइल मजकुरी (वय ४२ धंदा मजुरी रा. संभाजी नगर ताराहाइट्स बी / ४०४, लोणीकाळभोर ता हवेली) या पाच सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या सात जणांची पोलिस कस्टडी संपण्यापुर्वीच लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील प्रविण मडखांबे याला अटक केली आहे.
साहेब, इंधन चोरीबरोबरच गुटखा व सिमेंट माफियांच्याही मुसक्या आवळा..
लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत इंधन चोरीबरोबरच बेकायदा गुटखा व दोन नंबरचे सिमेंट विक्रीही जोरात चालु आहे. राज्यात गुटखा बंदी असतानाही, गल्लोगल्ली असणाऱ्या टपऱ्यात गुटखा खुले आम मिळत आहे. हा गुटखा कोण आनतो व कोण त्याची विक्री करतो याची माहिती पोलिसांना आहे. तर दुसरीकडे दोन नंबरचे सिमेंट ब्रॅन्डेड पिश्वयात भरुन त्याची विक्री करणारी जमातही लोणी काळभोर हद्दीत मोठी आहे. या दोन्हीकडे साहेबांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा नागरीकांचीआहे