अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरदेवाच्या घरी आयोजित केलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधेनंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी ५९ जणांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा समावेश आहे.
मवेशी करवंदरा येथील एका कुटुंबात हळदीचा कार्यक्रम होता. या वेळी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, जेवण झाल्यावर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरु झाला. त्रास होणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर एकच गोंधळ उडाला. विषबाधा झालेल्या मंडळींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात 7 लहान बालकांचा देखील समावेश आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विषबाधा झालेल्या सर्वांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने रुग्णालयात पोहचले.
दरम्यान, अकोला जिल्ह्यात आणखी एक विषबाधेचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. अकोला शहरातील महापालिकेच्या शाळेत मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. मुलांनी पोषण आहार खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेत १० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर अकोले तालुक्यात पुन्हा एकदा विषबाधेची घटना घडली आहे.