पुणे : शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून मारहाण केल्याच्या प्रकरणात गज्या मारणे याच्यासह १४ जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाईचे आदेश मंगळवारी दिले आहेत.
या प्रकरणी गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बाबाजी पाटील (वय ३९, रा. बरली, ता. पलूस, जि. सांगली). अमर शिवाजी किर्दत (वय ४६) फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, जि. सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नन्हे). नितीन पगारे (रा. सातारा). प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांवर मकोका कारवाई करण्यात आली. यात चौघांना अटक करण्यात आली असून या घटनेनंतर गज्या मारणे व इतर साथीदार फरार झाले आहेत.
33 वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार यांची शेअर मार्केट व्यवहाराची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तक्रारदार यांची कंपनी डबघाईला आल्याने परतावा देता आला नाही. पाटील याने वारंवार चार कोटींच्या बदल्यात २० कोटींची मागणी केली. थोड्या दिवसात चार कोटी रुपये देतो किंवा जमीन नावे करून देतो, असे तक्रारदाराने सांगितले.
हेमंत पाटील याने २० कोटींसाठी पप्पू घोलपला तक्रारदाराकडे पाठवले. हे पैसे तक्रारदार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी गजा मारणे टोळी यामध्ये सहभागी झाली. त्यांनी शुक्रवारी दुपारी या व्यावसायिकाचे कात्रज परिसरातून अपहरण केले. त्याच्याकडे २० कोटींची खंडणी मागितली. खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाला हा प्रकार समजला. पोलिसांनी शोध घेऊन शनिवारी दुपारी व्यावसायिकाची सुटका केली. त्याचवेळी आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कणीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे गुन्हे शाखा युनिट 5 ये पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, अविनाश लाहोटे, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मॅगडे, प्रमोद टिळेकर, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले, अकबर शेख, पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने काही आरोपींना अटक केली आहे. I