मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा असल्याचं म्हणत आपल्याला मारण्यासाठी षडयंत्र रचल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. त्याशिवाय आता जरांगे सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांचं नाव घेता त्यांच्यावर टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे यांनी भाषणामध्ये आक्रमक होत पायी सागर बंगल्याच्या दिशेने आपण जाणार असल्याचे म्हटले होते. गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून उपोषण करत असल्याने जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे, मराठा बांधवांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवले. सध्या त्यांचा गाडीतून प्रवास सुरू आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, ‘शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला अशांत करण्याचे काम सुरू आहे. परत एकदा मनोज जरांगे यांनी हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होते, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तजित केले आहेत. रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे यामागे राजकीय हेतू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे’, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
जरागेंनी फडणवीसांवर कोणते आरोप केले?
पाच महिने झाले तरी देवेंद्र फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.