लोणी काळभोर : तलाठ्यांच्याकडून हवेली तालुक्यात खातेदार शेतकऱ्यांचे फेरफार नोंदीसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे सुरुच असून ई फेरफार प्रणालीला तलाठ्यांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. यामुळे खातेदार हवालदिल झाले असून नोंदणीकृत दस्ताच्या फेरफार नोंदीसाठी त्यांच्या तलाठी कार्यालयात चकरा सुरू झाल्या आहेत. तर यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हवेलीमध्ये ई म्युटेशनद्वारे दस्तनोंदणी झालेल्या तब्बल २४२६ नोंदी तलाठ्यांनी घेतल्याच नाही. तसेच मंडलाधिका-यांनी नोटीस बजावून पंधरा दिवसांचा कालावधी पुर्ण होऊनही अनोंदणीकृत ६९१ फेरफार नोंदी व नोंदणीकृत ३७१ फेरफार नोंदी निर्गतीकामी प्रलंबित ठेवल्याचे कार्यालयीन आकडेवारीनुसार दिसत आहे. त्यामुळे नोंदणीकृत ई फेरफार प्रणालीला काही तलाठ्यांनी स्पीड ब्रेकरचा अडथळा निर्माण केला आहे.
महाराष्ट्र राज्यात नोटीस बजावून पंधरा दिवसांत फेरफार निर्गत होण्याचे प्रमाण ३२ दिवस आहे तर हवेली तालुक्यात फेरफार निर्गतीचे प्रमाण ८४ दिवस आहे. हवेली तालुक्यात फेरफार तयार करण्यासाठी उपस्थित होऊन एक महिन्यात न झालेल्या फेरफारांची संख्या ९९३ वर पोहचली असून दोन महिने होऊनही फेरफार न घेतलेली संख्या ६९२ आहे. तसेच तीन महिने व त्यापेक्षा जास्त दिवस तलाठ्यांनी ई म्युटेशन फेरफार नोंदी न घेतलेल्यांची संख्या ७४१ वर पोहचल्याने सुमारे २४२६ फेरफार नोंदीना तलाठ्यांनी ब्रेक लावल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गाव कामगार तलाठयाने पदभार स्विकारल्यापासून आजपर्यंत एकही ई म्युटेशनची फेरफार नोंद घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या तलाठी सजात एकूण १८७ ई म्युटेशन दस्ताच्या नोंदीला ब्रेक लागला आहे. ई म्युटेशन होऊनही फेरफार नोंद होत नसल्याने शेतक-यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसील कार्यालयात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी मासिक बैठकीत खरोखरच याचा आढावा घेणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
याबाबत बोलताना वडकी येथील शेतकरी सत्यवान चव्हाण म्हणाले कि, आमच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे एक सप्टेंबरला रजिस्टर वाटपपत्राचा दस्त ई म्युटेशन दस्त नोंदणीच्या आधारे केला आहे. त्यानतंर आपली चावडीवर अजून फेरफार नोंद वडकी तलाठी यांनी घेतलेली नाही. याविषयी सात ते आठ चकरा तलाठी कार्यालयात मारलेल्या आहेत.दोन दिवसांत फेरफार होईल असे उत्तर तलाठ्यांकडून देण्यात येते. याबाबत रजा राखीव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे समक्ष भेटून लेखी तक्रार केली आहे. त्यांनी हवेलीचे महसूल नायब तहसीलदार यांना भेटण्यास सांगितले आहे.