सागर जगदाळे
भिगवण : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रावणगाव व मळद ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवची आई मंदिरातील गाभारा अज्ञात व्यक्तींनी जाळला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोमवारी (ता. १०) रात्री १० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून या आगीत मंदिरातील देवीच्या मूर्तीलाही आगीच्या झळा लागून मूर्ती पूर्णपणे तडकल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ११) नेहमीप्रमाणे भाविक देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी भाविकांना सदरची घटना दिसून आली. यावेळी या समाजकंटकांनी मंदिरातील देवीचे खण, साडी तसेच छबिन्याचे साहित्य खाली फेकून तेलाचा डबा गाभाऱ्यात ओतून पेटविल्याने सर्व गाभारा जळून खाक झाला. कोणीतरी समाजकंटकांनी जाणुनबुजून हे कृत्य केले असण्याची शक्यता भाविक व ग्रामस्थांकडुन वर्तवली जात आहे.
दरम्यान, रात्रभर लागलेल्या आगीमुळे मंदिरातील देवीच्या मूर्तीलाही आगीच्या झळा लागून मूर्ती पूर्णपणे जळून तडकल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी मंदिर परिसरात धाव घेत तीव्र संताप व्यक्त केला असून, या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. हे कृत्य करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी केली आहे.