पुणे : पुणे पोलिसांनी तब्बल ४ हजार कोटींचे ड्रग्ज पुण्यात जप्त केले. देशातील सर्वात मोठे ड्रग्स रॅकेट उघड केल्यानंतर ड्रग्जचे सांगली कनेक्शन समोर आले होतं. आता अजून एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सांगलीतून जप्त केलेले ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले ३०० कोटींचे १४० किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आयुब मकानदारसह दोघांना ताब्यात घेतले होते. तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला होता. यामध्ये १४० किलोची ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ३०० कोटींच्या आसपास किंमत असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
दरम्यान, पुणे पोलीस आणि सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकून तपासणी केली असता, त्याठिकाणी मीठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यातील काही माल हा गोव्यात विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. सांगलीत अटक करण्यात आलेला आयुब मकानदारवर यापूर्वीही ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता. तसेच तो सात वर्षे येरवडा कारागृहात होता. कारागृहात पुण्यातील आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती. त्यामुळे मकानदारकडे हा साठा तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता याची माहिती मिळताच पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी छापेमारी केली होती.
जप्त केलेले ड्रग्ज
– दिल्लीत ६०० किलो एम डी ड्रग्ज जप्त, दुसऱ्या कारवाईत १२०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
– ४ हजार कोटी रुपयांचे २ हजार किलो एम डी ड्रग्ज जप्त
– पुणे पोलिसांकडून पुणे, कुरकुंभसह दिल्लीत छापेमारी
– सोमवार पेठेतील छापेमारीमध्ये २ किलो जप्त
– विश्रांतवाडी येथील गोदामातून १०० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे ५५ किलो ड्रग्ज जप्त
– कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात ११०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
– दिल्लीत ८०० कोटी रुपयांचे ४०० किलो एमडी ड्रग्ज जप्त
– आणखी एका कारवाईमध्ये दिल्लीत १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ६०० किलो ड्रग्ज जप्त