पुणे – किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आकुर्डी येथे रविवारी (ता. ९) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी जगतपाल बाबू शेट्टी (वय. 58, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश पिराजी खाडे वय. (32, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन बन्सराज प्रसाद गौतम (वय. 35, रा. आकुर्डी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन हा रविवारी (ता. ९ ) रात्री साडेआठच्या सुमारास किरण ज्वेलर्स समोरील इलेक्ट्रिक पोलजवळ बसला होता. त्याच दरम्यान आरोपी महेश देखील त्या ठिकाणी आला. आणि मोहन आणि आरोपी महेश यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली, आणि मग महेश याने मोहन यांच्या डोक्यात जोरात लाथ मारली. लाथ मारल्याने त्यांचे डोके इलेक्ट्रिक पोलला धडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी महेश पिराजी याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलिस तपास करीत आहेत.