पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल भानुदास पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणार्यास अटक झाल्यानंतर त्याचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात उमटले आहेत. सहायक आयुक्तांसह अन्य दोन अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक वसंत देवकाते यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले असून उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलबंन करण्यात आले आहे. सोहम धोत्रे असे निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक धोत्रे हे देहूरोड पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होते.
किवळे येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्या वडिलांकडून ५ लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ या दोघांची देहूरोड पोलिस ठाण्यात नियुक्ती केली होती.
देहूरोड पोलिसांच्या तपास पथकात ते कार्यरत होते. तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांचा वचक न राहिल्याने हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ यांनी पोलिस दलाची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य केले. दरम्यान, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. देहूरोडच्या तपास पथकाकडून अवैध धंद्यांना आळा बसवणे आवश्यक होते. मात्र, गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारणांमुळे पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना निलंबित करण्यात आले आहे.
नेमक प्रकरण काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे स्टेशन जवळ एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंग मध्ये सापळा रचून एका वाहन चालकाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने देहूरोडचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले होते. कात्रज-कोंढवा बायपास रोडवरील एका जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज मुगुटलाल पाटील यांच्याकडे चौकशीसाठी आला होता. त्या तक्रार अर्जामध्ये तक्रारदार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये घेण्यात आले असल्याचे चौकशीत आढळून आले होते.