इंदापूर : जुन्या भांडणाच्या कारणावरुन महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना लाकडी (ता. इंदापूर) येथे सोमवारी (ता. १०) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
रुपाली शेखर काटे (वय ३२, रा. लाकडी, ता. इंदापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राजेंद्र रामचंद्र जराड (वय ३५, रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ललेंद्र मारुती शिंदे (वय ३५, रा.लाकडी) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली शेखर काटे व राजेंद्र रामचंद्र जराड यांचे जागेवरून वारंवार वाद विवाद होत होते. सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जराड याने रुपाली काटे या महिलेच्या घराच्या पाठीमागील बाजूस जुन्या भांडणाच्या कारणावरुन रुपाली हिचा गळा चिरुन खून केला. व स्वतः हि महिलेच्या खूनानंतर गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जराड याच्यावर बारामती येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.