लोणी काळभोर : शिवजन्मोत्सवानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंगळवार (ता. २०) ते गुरुवार (ता. २२) असे सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. श्रीयश राहुल काळभोर यांनी दिली.
लोणी काळभोर येथील श्री दत्त मंदिर ते पाषाण बाग या दरम्यान भव्य पारंपरिक मिरवणूक व मर्दानी खेळ मंगळवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. बुधवारी (ता. २१) सकाळी ११ ते दुपारी एक या कालावधीत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामधील प्रथम विजेत्याला सोन्याची नथ, द्वितीय विजेत्याला रेफ्रिजरेटर आणि तृतीय विजेत्याला स्मार्ट टीव्ही बक्षीस दिले जाणार आहे.
लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरीयल हायस्कूलमध्ये बुधवारी (ता. २१) दुपारी चार ते सहा या वेळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी वर्ग गट आणि इयत्ता पहिली ते चौथी वर्ग गट असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. पाचवी ते बारावीच्या वर्ग गटातील प्रथम विजेत्याला टॅबलेट फोन, द्वितीय विजेत्याला स्मार्ट सायकल आणि तृतीय विजेत्याला स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात येणार आहे. तर पहिली ते चौथीच्या वयोगटातील प्रथम विजेत्याला क्रिकेट किट, द्वितीय विजेत्याला स्कूल किट आणि तृतीय विजेत्याला कलर किट अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दरम्यान, लोणी काळभोर येथील पाषाणबागेजवळ गुरुवारी (ता. २२) सायंकाळी सहा वाजता शिव व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. नितीन बानुगडे हे प्राध्यापक व्याख्याते आहेत. त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जगणे समाजासाठी, नाते संस्कारांचे, यशवंतराव चव्हाण अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या व्याख्यानांना हजारोंच्या संख्येने गर्दी जमते. त्यामुळेच लोणी काळभोर येथील त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
जय भवानी ग्रुपचा स्तुत्य उपक्रमाचे होतेय सर्वत्र कौतुक
जय भवानी ग्रुप हा दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरे करीत असते. हे त्यांचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच समाज प्रबोधन करण्यासाठी शिव व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. जय भवानी ग्रुपने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. श्रीयश काळभोर म्हणाले की, शिवजन्मोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोरमध्ये पहिल्यांदाच शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच चित्रकला व रांगोळी स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धांमध्ये लोणी काळभोर व परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन काळभोर यांनी केले आहे.