नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना फोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश घडवून आणण्याची रणनिती आखत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अशातच आता भाजपशी जवळीक असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून, राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ ते सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. ते सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते भाजपविरोधी आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत. परंतु, रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे हेच भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. राणा यांच्या दाव्यानुसार, उद्धव ठाकरे हे सध्या बेचैन आहेत. मोदीजींची कधी माफी मागतो, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांना मोदीजींसमोर आत्मसमर्पण करायचे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सध्या काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला.
उद्धव ठाकरे यांना अहंकारामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला होता. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.
या वेळी त्यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे राज्यावरचे विघ्न आहेत. संजय राऊत हे दिल्लीत आहेत, पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा बेगडी आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.