नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलं होतं. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सोमवारी १९ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देतं का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल आहे. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेमध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नव्हती.
त्यामुळे ते प्रकरण प्रलंबित होते. उर्वरित सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांनी हे प्रकरणाची तातडीने सुनावणी घ्याण्यात यावी अशी मागणी न्यायालयाला केली होती. त्यानंतर न्यायालयाने आज १९ फेब्रुवारीला सुनावणीसाठी तारीख दिली आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.वी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे.
१५ फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता आणि पक्षाबाबत निर्णय दिला. तेव्हा, अजित पवार आणि शरद पवार गटातील आमदारांना नार्वेकरांनी पात्र ठरवलं होत. तसेच, विधीमंडळातील बहुमताच्या आधारावर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं. या निर्णयानंतर शरद पवार गट न्यायालयात जाऊ शकते याचा अंदाज अजित पवार गटाला होता. त्यामुळे अजित पवार गटाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे न्यायालयात शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होत असताना अजित पवार गटाचे म्हणणे न्यायालयाला ऐकून घ्यावे लागणार आहे.