पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात वसुली अधिकाऱ्यांकडून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एजन्सीच्या वसुली अधिकारी यांच्यासोबत वाद सुरु असताना त्याचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून वसुली अधिकाऱ्यांकडून एकाला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वखार महामंडळाच्या जवळ पी.एम.टी. बसस्टॉप समोर शनिवारी १७ फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला.
याबाबत सागर किशोर तुपसुंदर (वय-३८ रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विनोद चव्हाण (वय-२३ रा. म्हसोबा चौक, टिळेकर नगर, कोंढवा) आणि शुभम देविदास पवार (वय-१९ रा. टिळेकर नगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी हे माही एजन्सी कंपनीत वसुलीचे काम करतात. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पी.एम.टी. बस स्टॉप समोर आरोपींचे एक महिला आणि पुरुषासोबत वाद सुरु होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग करत होते.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या तोंडावर, नाकावर आणि पाठीवर हाताने व पायाने बेदम मारहाण केली. तसेच खाली पाडून लाकडी बांबूने देखील मारहाण केली. या घटनेत फिर्यादी यांच्या दाताला गंभीर दुखापत झाली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शिवागाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.