पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोरेगाव पार्क पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत थायलंड येथील दोन महिलांची सुटका करुन महिला स्पा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १५ फेब्रुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास केली.
हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोड येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावर सुरु होता. याप्रकरणी पोलीस हवालदार रईसा समीर बेग (वय-३८) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मूकडा गेटाईसॉन्ग हीच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील कोरेगाव पार्क येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून थायलंड येथील २ महिलांची सुटका केली.
आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करत आहेत.